- संचात तीस वस्तुंचा समावेश
- दहा लाख लाभार्थींना देण्याचे नियोजन
पिंपरी – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंद असलेल्या सक्रिय कामगारांना मंडळाच्या वतीने तीस वस्तुंचा समावेश असलेल्या गृहपयोगी वस्तुंचा संच दिला जाणार आहे. त्याकरिता राज्यभरातील दहा लाख कामगारांना या संचाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरुपी रोजगार नसतो. बांधकाम साइटचे काम पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या शोधार्थ या कामगारांना अन्य बांधकाम साइटवर स्थलांतरित व्हावे लागते. अशावेळी स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन या बाबींशी जुळवून घ्यावे लागते. या कामगारांची नोंदणी सुकर होऊन, या घटकाला मंडळाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध 30 कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, याकरिता प्रयत्न केले जात आहेत.
बांधकाम कामागारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानगीसाठी आकारला जाणारा एक टक्का उपकर मंडळाकडे जमा केला जातो. सद्यस्थितीत मंडळाकडे हा सात हजार कोटींचा निधी उपलब्ध आहे. मात्र, तरी देखील या घटकासाठी प्रभावी योजना राबविली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंडळाकडून काळानुरुप कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.
बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या या गृहपयोगी वस्तुंच्या संचातील वस्तुंच्या दर्जाची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडून करून घेतली जाणार आहे. तसेच या वस्तुंवर मंडळाचे नाव कोरले जाणार आहे. या संचाचे वितरण करताना लाभार्थ्याचे छायाचित्र व बायोमॅट्रीक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य आहे. हे संच वितरणासाठी शिबिरांचे आयोजन करण्याच्या सुचना मंडळाने केल्या आहेत.
आमदार जगताप व बांधकाम कामगार सेनेची मागणी
2019 मध्ये आलेल्या पुरामुळे अनेक कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने त्यांना गृहपयोगी वस्तू उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंडळाच्या सचिवांकडे ऑगस्ट 2019 मध्ये निवेदनद्वारे केली होती. तसेच, अशाप्रकारची मागणी बांधकाम कामगार सेनेनदेखील केली होती. या प्रयत्नांना यश आल्याची प्रतिक्रिया सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी दिली आहे.