इस्लामाबाद : अफगाणिस्तानमधील तालिबानींनी 2018 मध्ये ओलिस ठेवलेल्या तिघा भारतीयांची अज सुटका करण्यात आली. अफगाणिस्तानमधील तुरुंगात असलेल्या 11 कट्टर दहशतवाद्यांच्या सुटकेच्या बदल्यात या तिघा भारतीयांची सुटका करण्यार आली. अफगाणिस्तानसाठीचे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी झालमाय खलिलझाद आणि तालिबानी प्रतिनिधींचा प्रमुख मुल्ला अब्दुल घनी बरादार यांच्यात गेल्या आठवड्यात इस्लामाबादेत झालेल्या चर्चेनंतर भारतीयांची सुटका करण्यात आली. आज (सोमवारी) सकाळी ओलिस असलेले भारतीय इंजिनिअर आणि तुरुंगात असलेले 11 दहशतवादी यांची एकाचवेळी सुटका आणि आदान-प्रदान करण्यात आले, असे स्थानिक रेडिओवरील वृत्तात म्हटले आहे. मात्र ओलिस आणि कैद्यांची आदानप्रदान नक्की कोठे झाली, हे मात्र या वृत्तात सांगितले गेले नाही.
राजधानी काबूलच्या उत्तरेस असलेल्या बग्राम लष्करी तळावर अफगाणिस्तानच्या सर्वात मोठ्या तुरूंगातून तालिबानींना सोडण्यात आले. अमेरिकेच्या सैन्याने अनेक वर्षांपूर्वी हा तळ अफगाण सुरक्षा दलांच्या ताब्यात दिला होता, तरीही अजूनही बग्राम येथे अमेरिकेचे सैन्य आहे. तालिबानी कैद्यांना अमेरिकेने सोडले की अफगाणी सैन्याने सोडले हे स्पष्ट झाले नाही. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्रालय आणि अध्यक्षांच्या कार्यालयानेही या घडामोडींवर काहीही व्याच्यता करण्यास नकार दिला आहे.
मे 2018 च्या पहिल्या आठवड्यात उत्तर बागलान प्रांतातील बाग-ए-शामल भागात सात भारतीय इंजिनिअर व त्यांच्या अफगाण चालकांचे अपहरण करण्यात आले, तेथील विद्युत उपकेंद्रात ते कार्यरत होते. या अपहरणाची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतली नव्हती. या 7 भारतीयांपैकी एकाची मार्च महिन्यात सुटका झाली होती.