बीजिंग: चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला आहे. यावेळी वुहान शहरात नव्हे, तर हार्बिन शहराला करोनाने आपले केंद्र बनवले आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून 1 हजार 240 किलोमीटर दूर असलेले हार्बिन शहरामध्ये 70 लोकांना करोनाची लागण झाली आहे.
हार्बिन हे चीनमधील हेलॉन्गजियांग प्रांताची राजधानी आहे. येथील लोकसंख्या जवळपास एक कोटी आहे. या मोठ्या शहरात 131 जिल्हे, 107 तालुके, 62 टाऊनशिप आणि 1 हजार 879 गावे आहेत. आकाराने हार्बिन भारताच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या दिल्लीहून 36 पट मोठे आहे. या शहरात 70 रूग्ण आढळून आल्यानंतर हे शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे.
हार्बिनमध्ये ज्या 70 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या नातेवाईकांवर नजर ठेवण्यात येत आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंगसाठी शेकडो लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. हार्बिनमध्ये फक्त त्याच लोकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांनी करोना ऍप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले आहे आणि ज्यांना करोनाची बाधा झालेली नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, हार्बिनमध्ये करोना पसरण्यामागील सर्वात मोठं कारण न्यूयॉर्कमधून परतलेला एक विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांमध्ये करोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणि आजूबाजूच्या 4 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यावेळी त्यातील 70 जणांना करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, चीन सरकार देशातमध्ये फक्त करोनाचे दोन रूग्ण असल्याचा दावा करत आहे. तसेच मागील आठ दिवसांपासून करोना व्हायरसमुळे कोणचाही मृत्यू झालेला नाही. आता हार्बिनमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्तामुळे चीन सरकार करत असलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.