फेरपरीक्षा नोव्हेंबरमध्ये; पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय

तांत्रिक अचडणींमुळे परीक्षा पूर्ण न देता आलेल्यांना दिलासा

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत तांत्रिक अचडणींमुळे परीक्षा पूर्णपणे देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

पुणे विद्यापीठाची पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू झाली. ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेत प्रश्नांचे सुमार दर्जाचे भाषांतर, प्रश्न किंवा उत्तरांचे पर्याय न दिसणे, फॉन्ट बदलल्याने प्रश्न वाचता न येणे, अचानक परीक्षा बंद होणे, लॉगइन न होणे, पेपर सबमीट न होणे अशा समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. अनेकांना पेपर सोडवता आले नसल्याने अनुत्तीर्ण होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म भरून घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी नोंदवून घेण्यास सुरूवात केली. या गुगल फॉर्ममधील समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी एक उपकुलसचिव दर्जाचे अधिकारी व कर्मचारी यांची समिती नेमली आहे.

 

दरम्यान, विद्यापीठाकडे आजमितीस साडेतेरा हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 8 हजार विद्यार्थ्यांनी त्यांचा पेपर सबमिट झाला नाही, अशी तक्रार केली आहे. त्यासह प्रश्न चुकीचे येणे, मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून पेपर न दिसणे, लॉग-इन न होणे अशा प्रकारच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका विद्यीपाठाने घेतली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा दि.1 ते 5 नोव्हेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे. त्याचे लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले.

 

 

…”त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा ग्राह्य

ऑनलाइन परीक्षा देताना अचानक तांत्रिक समस्या येऊन परीक्षा थांबल्याचे निदर्शनास आले. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ज्यांनी 50 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पेपर सोडवला आहे किंवा 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रश्न सोडविले आहेत, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे. त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची गरज पडू नये याबाबत विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

 

 

ऑनलाइन परीक्षा अखेर सुरळीत

शुक्रवारी 72 हजार 394 विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेसाठी, तर 18 हजार 724 विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेसाठी अपेक्षित होते. त्यापैकी 72 हजार 680 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाइन परीक्षा दिली. तर 13 हजार 547 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. आज ऑफलाइनकडील 286 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. त्यामुळे आता ऑनलाइन परीक्षेकडे विद्यार्थी पसंती देत आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.