मुंबई – वन मॅन शो म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांची आज जयंती.राज कपूर यांचा अभिनेता बनण्याचा प्रवास रंजक होता,आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचा हा फिल्मी प्रवास.
राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 ला पेशावरमध्ये झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर भारतात आले. त्यांना नाटकांची विशेष आवड होती. राज कपूर आणि दिग्दर्शक केदार शर्मा यांच्यात एक अतूट नातं होतं. राज कपूर त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात असिस्टंट म्हणून केदार शर्मांसोबत काम करत असत.
करिअरच्या सुरुवातीला शूटिंग दरम्यान, एकदा क्लॅप देताना चूक झाल्यानं केदार यांनी सर्वांसमोर राज कपूर यांच्या कानशीलात लगावली. त्यावेळी राज यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांचे डोळे पाहिल्यावर केदार शर्मांना आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याचा पुढचा सिनेमा ‘नीलकमल’साठी राज यांना नायकाच्या भूमिकेसाठी कास्ट केलं.
मेरा नाम जोकर, बूट पॉलिश, आवरा असे अनेक चित्रपट आजही सिनेप्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. राज कपूरचे चित्रपट आजच्या सारखे चमकत्या दुनियेचे प्रतिनिधीत्व करणारे नव्हते. मनोरंजनाआड काही तरी संदेश त्यातून दिला जात असे. आधी हकीकत आधा फसाना अशी त्यांची शैली होती.
सामान्य माणासाला नायक बनवून त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला जे सांगायचे आहे, ते सांगितले. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवात दाखविले जातात, याचे कारण हेच आहे.