नेवासा – काँग्रेस नेते राहूल गांधी यांचे स्विय सहाय्यक व भारत जोडो न्याय यात्रेचे समन्वयक सुशांत शर्मा यांनी शिंगणापूर येथे शनी मूर्तीवर तैलाभिषेक करत शनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात अभिषेकही केला.
राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेने मंगळवारी महाराष्ट्रात नंदुरबार येथून प्रवेश केला. नंदुरबार नंतर धुळे येथे मोठा मेळावा तसेच महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यात्रेतून सवड काढत सुशांत शर्मा यांनी काल शिर्डी तसेच शनी शिंगणापूर येथे दर्शन घेतले;
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी त्यांचे शनिशिंगणापूर येथे स्वागत केले. यावेळी नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पटारे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, सोशल मीडियाचे सचिन बोर्डे हे उपस्थित होते.सुशांत शर्मा यांनी यावेळी शनिशिंगणापूर देवस्थानची माहिती घेतली. तसेच नूतन सुरू झालेल्या दर्शन रांगेची पाहणी करत देवस्थान च्या सुरू असलेल्या विकासात्मक कामाची माहिती घेत समाधान व्यक्त केले.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पटारे पाटील यांनी नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबीची माहिती यावेळी सुशांत शर्मा यांना दिली त्यावेळी सुशांत शर्मा यांनी पुढील काळ हा काँग्रेससाठी उज्वल असून विधिमंडळ पक्ष नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संघटनेत पुन्हा नंबर एकवर राहील असा आशावाद व्यक्त करत,आपण सर्वांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.