सणबूर (वार्ताहर) – कुठरे-सुपुगडेवाडी, ता. पाटण गावच्या वनहद्दीत रात्री 11.30 च्या सुमारास शिकार करण्यासाठी गेलेल्या दोघांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून शिकार करण्यात आलेला नर जातीचा ससा, इलेक्ट्रॉनिक यंत्र, दोन बॅटरी, बांबू छत्री जप्त करण्यात आली.
वनविभागाने दिलेली माहिती अशी की, वनविभागाच्यामार्फत कुठरे, ता. पाटण या परिसरामध्ये गस्त घालत असताना सुपुगडेवाडी येथील डोंगरातून गावचे दिशेने येणारे सर्च लाईट दिसली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी गावाशेजारील ओढ्यामध्ये दबा धरून बसले असता कुठरे येथील शिवाजी रामकृष्ण पाटील (वय 40), रमेश मारूती पाटील (वय 35) हे दोघे ससा या वन्यप्राण्यांची शिकार करून आल्याचे लक्षात येताच त्यांना ताब्यात घेतले. आणि चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. वनक्षेत्रपाल विलासराव काळे यांनी या दोघांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा केला आहे. या कारवाईत वनपाल सुभाष राऊत वनपाल, अमृत पन्हाळे, विशाल डुबल, जयवंत बेंद्रे यांचा सहभाग होता. यावेळी वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी दिले.