गांधीनगर- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने जय्यत तयारी सुरू केली असताना कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर आता कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी सक्रिया राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत सिंह सोलंकी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे पुत्र आहेत. माधवसिंह चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहीले आहेत. तर भरतसिंह या त्यांच्या मुलाकडे कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष पद सोपवले होते. मात्र सध्या भरतसिंह यांच्या कौटुंबिक आयुष्यात एक वादळ उभे राहीले आहे. त्यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात सोलंकी यांची पत्नी रेश्मा त्या महिलेची केस ओढताना आणि तिला आपला चेहरा दाखवण्यास सांगताना दिसते आहे.
सोलंकी यांनी घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. आपल्या खासगी आयुष्यातील काही बाबी जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत आपण बाजुला होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेसला हा आणखी एक फटका असल्याचे मानले जाते आहे. कालच कॉंग्रेसचे माजी कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
एकीकडे अनेक आमदार पक्ष सोडून गेले आहेत. हार्दिक यांनीही भाजपची वाट धरली आहे. माजी प्रदेशाध्यक्षांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे, असे असताना कॉंग्रेसने निवडणुकीच्या अगोदरच राज्य गमावले की काय असा प्रश्न पडावा अशी दयनीय अवस्था सध्या पक्षाची झाली आहे.