संसदेच्या सुरक्षेतील अक्षम्य चुकीने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी सागर शर्माने सर्वात मोठा खुलासा केला आहे. चौकशी दरम्यान सागरला संसदेबाहेर आत्मदहन करायचे होते,” अशी धक्कादायक माहिती त्याने दिली आहे. सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे दोन लोक सभागृहात घुसले आणि त्यांनी स्मोक बॉम्बने हल्ला केला आणि सभागृहात धूर पसरला.
अशात आता संसदेत फोडण्यात आलेल्या स्मोक कँडलची कल्याणमधून खरेदी खरेदी केल्याचे माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणेची शोधमोहीम सुरू झाली आहे. स्थानिक पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांना याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत कोणत्याही केंद्रीय एजन्सीने आम्हाला कोणत्याही दुकानांची माहिती दिली नाही, परंतु बातम्यांवरून समजल्यानंतर आमची टीम दुकान शोधण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक पोलिसांनी कल्याण मधील फटाके विक्रेत्यांचे चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संसदेतील फटाक्यांचे कल्याण कनेक्शन समोर आल्यानंतर कल्याण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत सागर शर्माने, “त्याला आत्मदहन करायचे होते. त्यांनी संसदेबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याची योजना आखली होती. मात्र नंतर ही योजना रद्द करण्यात आली. आग लावण्यासाठी जेलसारखा पदार्थ ऑनलाइन खरेदी करण्याची योजना आखण्यात आल्याचेही सागरने पोलिसांच्या विशेष कक्षाला सांगितले आहे. हे जेल शरीरावर लावल्याने आगीपासून स्वतःचा बचाव होतो. मात्र, ऑनलाइन पेमेंट न झाल्यामुळे जेलची खरेदी होऊ शकली नाही आणि मग संसदेबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा बेत मागे पडला,” असा धक्कादायक खुलासा सागरने चौकशीत केले आहे.