पुणे -अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली. शहरात नव्याने पाच हजार 152 वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच तीन हजार 51 दुचाकींची संख्या आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत घट झाल्याचे सांगण्यात आले.
गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया आणि दसरा या शुभ मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. दि.15 ते 22 एप्रिल या आठ दिवसांत कालावधीत पुणे आरटीओ 5 हजार 152 वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 3 हजार 51 दुचाकी तर, 1 हजार 343 कारची संख्या आहे. यानंतर रिक्षा आणि इतर वाहनांचा समावेश आहे. हेल्मेट, ऍक्सेसरिज मोफत देत ग्राहकांना आकर्षित केले.
416 ई-वाहनांची खरेदी
पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी नागरिकांकडून आता ई-वाहन खरेदीला पसंती दिली जात आहे. यामुळे अक्षय्य तृतीयेला 416 नव्या वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये 370 दुचाकी तर 26 कारचा समावेश आहे. गतवर्षी 461 वाहनांची नोंद झाली होती.