पुणे -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात 2021 मध्ये दाखल झालेल्या पुण्यदशम बसची दोनच वर्षात दुरावस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांत या बसमधील एसी बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या. पीएमपी प्रशासनाने या बसमधील एसी दुरूस्त करण्याऐवजी या बसवर नॉन एसी बसचे स्टिकर्स लावून यातून पळवाट शोधली आहे. पीएमपीच्या या अजब कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
शहराच्या मध्य वस्तीमध्ये नागरिकांना वातानुकुलित बस सेवा देण्यासाठी पुणे महापालिकेने “पीएमपीएमएल’ला 2021 मध्ये 50 वातानुकुलित बस खरेदी करून दिल्या होत्या. मोठा गाजावाजा करत “दहा रुपयांमध्ये दिवसभर वातानुकुलित बस सेवा’ अशी जाहीरातबाजी करण्यात आली. पण, सुरुवातीचे काही दिवसच या बसमधील एसी सुरू राहिला. नंतर या बसमध्ये कायमच एसी बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. बसमध्ये जास्त गर्दी झाल्यानंतर बसचा एसीच चालत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे या बसमधून प्रवास नागरिकांसाठी अडचणीचा ठरत आहे.
या विरोधात प्रवाशांकडून पीएमपीकडे वारंवार तक्रार केल्यानंतर पीएमपी प्रशासनाने पुण्यदशम बसमधील एसी सुरू झाल्यानंतरच बस मार्गावर धावतील अशी भूमीका मंगळवारी घेतली होती. पण, दुसऱ्याच दिवशी पीएमपी प्रशासनाने पुण्यदशम बसवर “नॉनएसी बस’चे स्टिकर लावून यातून पळवाट काढली आहे. यावरून पीएमपीकडे एसी दुरूस्त करण्यासाठी सक्षम व्यवस्था आहे की नाही ?, दोनच वर्षात या बसची इतकी दुरवस्था कशी झाली ?, बसची नियमीत देखभाल दुरुस्ती होती की नाही ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुण्यदशम् बसमध्ये जास्त प्रवासी बसल्यानंतर एसी बंद होत असेल तर पीएमपी प्रशासनाने बस खरेदी करताना शहरातील लोकसंख्येचा विचार केला होता की नव्हता ? प्रवाशांसाठी ही बस आरामदायी आणि सुरक्षित नाही.
-राजू पाटील, प्रवासी