पुणे -ताई, काका पुण्यद्शम बस गेली का?, बराचवेळ झाला तरी पुण्यद्शम बस आलीच नाही आणि आम्हाला दुसऱ्या बसने जावे लागले असा अनुभव प्रवाशांनी सांगितला. मात्र, प्रत्यक्षात आरटीओ पासिंग न केल्यामुळे पुणे परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) 50 पुण्यद्शम बस बुधवारी मार्गावर धावल्याच नाही. याची कल्पना प्रवाशांना नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पीएमपी प्रशासनाने शहरातील मध्यवस्तीत जलदबससेवा देण्यासाठी 2021 साली सात मिटरच्या 50 बस खरेदी केल्या होत्या. शहरातील 9 मार्गावर पुण्यद्शम बसमार्फत सेवा दिली जात होती. 10 रुपयात दिवसभर प्रवास करता येत असल्यामुळे या बसला नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता. मात्र, दरम्यानच्या काळात या बस ठेकेदारांनाही चालविण्यासाठी देण्यात आल्या होत्या. परंतू, ठेकेदाराला बस चालविणे परवडत नसल्यामुळे त्या पुन्हा पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या. त्यानंतर पीएमपी प्रशासनाकडून या बसचे संचलन सुरू होते.
पुण्यद्शम बस एकाचदिवशी नोंदणी असल्यामुळे या सर्व बसची गुरुवारी (दि. 13) आरटीओ पासिंग करण्यात येणार आहे, असे पीएमपीएमएलचे चीफ इंजिनिअर रमेश चव्हाण यांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून एसी बंदच…
पीएमपी प्रशासनाने शहराच्या मध्यवस्तीतील प्रवाशांना जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी 2021 साली “दस मे बस’ ही सेवा सुरू केली. या सर्व बस एसी आहेत. सुरुवातीचे काही दिवस या बसमधील एसी सुरू राहिला. परंतू, पीएमपीकडून या बसची देखभाल दुरूस्ती वेळोवेळी होत नसल्यामुळे इंजीनवर लोड येऊन बस बंद पडत होती. त्यामुळे या बसमधील एसी बंदच ठेवण्यात आले. याप्रकरणी महापालिकेने पीएमपी प्रशासनाने केलेल्या सूचनांना बगल देत बस खरेदी केल्याचे सांगितले होते.