मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील 11 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs PBKS) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर होणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण, चेन्नईने दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत तर पंजाबने दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघाला चांगली कामगिरी आजच्या सामन्यात करावी लागणार आहे.
आयपीएल स्पर्धेचं चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत. चेन्नई सुपर किंग्स सुरुवातीलाच कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाला होता. कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला 6 विकेट राखून सहज पराभूत केलं होतं. त्यानंतर गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनंही (Lucknow Super Giants) चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 6 विकेट्सनं पराभव केला. त्यामुळे आता कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात आज पंजाब विरुद्ध खेळणारा हा संघ कशी कामगिरी करणार, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून आहे.
पंजाबविरुद्ध चेन्नईच्या संघात दोन बदल पाहायला मिळू शकतात. अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राजवर्धन हंगरगेकर आणि इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डन यांना पहिल्यांदाच चेन्नईकडून खेळण्याची संधी मिळू शकते. टॉन्सिलच्या संसर्गामुळे जॉर्डनला सहा दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तो संघात परतण्याच्या तयारीत आहेत. रवींद्र जडेजा त्याला संधी देतो की नाही हे आता पहावे लागेल.
चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य संघ –
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस.
तर दुसरीकडे पंजाबने दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव करत आयपीएल 2022ची दमदार सुरूवात केली आहे. पंजाबनं पहिल्या मॅचमध्ये 206 रनचं मोठं टार्गेट सहज पूर्ण केलं. त्या मॅचमध्ये पंजाबच्या फलंदाजांनी दमदार बॅटींग केली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्ससोबत झालेल्या सामन्यात आंद्रे रसेलच्या तुफानी फलंदाजीसमोर पंजाबला झुकावं लागलं होतं आणि पराभवाला सामोरं जाव लागलं होतं.
पंजाबचा संघ तिसऱ्या सामन्यात दोन बदल करू शकतो. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि भारतीय अष्टपैलू ऋषी धवन यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. अशा स्थितीत शानदार फलंदाजी करणारा भानुका राजपक्षे आणि दोन सामन्यांत निराशा करणारा राज बावा यांना बाहेर बसावे लागू शकते.
पंजाब किंग्ज संभाव्य संघ –
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टन, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर.
दोन्ही संघाला आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. चेन्नईचा संघ आज हरला तर त्यांची पराजयाची हॅट्रीक होईल. आता पंजाब आणि चेन्नई, हे दोन्ही संघ काय कामगिरी करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.