सिंहगड रस्ता :पु.ल.देशपांडे उद्यानाशेजारी मनपाने बांधलेल्या इमारतीजवळून पाण्याचा प्रवाह असा वाहत आहे.
सहकारनगर – सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानालगत दररोज लाखो लिटर स्वच्छ पाणी गेली अनेक वर्षांपासून नाल्यात वाहून जात आहे. जनता वसाहतमधून मोठ्या पाइपमधून येणारे हे पाणी पुढे दत्तवाडी येथील नाल्यात जाते. याबाबत महापालिका तसेच पाटबंधारे विभागकडूनही सदर पाणी गळती आमच्या अखत्यारीतील नाही, असे स्पष्ट केल्याने शेकडो लिटर वाहून जाणाऱ्या पाण्याचा .”स्रोत’ नक्की कुठला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे पाणी वापराचा हिशेब लावणाऱ्या तसेच टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात कुचराई करणाऱ्या महापालिकेचे या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. तसेच, पाटबंधारे विभागही ही गळती आमची नसल्याचे सांगत असल्याने शेकडो लिटर स्वच्छ पाणी वाया जात आहे. याबाबत स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला आहे. परंतु, या दोन्ही विभागातील अधिकारी केवळ टोलवाटोलवी करीत आहेत. यातून पिण्यायोग्य पाण्याची मात्र नासाडी सुरू आहे.
पु.ल.देशपांडे उद्यानशेजारील ओढ्यावर पालिकेनेच पाणीपुरवठा विभागाकरिता इमारत बांधली, त्यामुळे ओढ्यातील पाणी झिरपून शेजारील बाजूस वाहत आहे. सदर इमारत बांधण्याच्या कामाला विरोध करूनही सदर काम करण्यात आले. सदर ठिकाणी पाणी वाहून जाताना त्यावर उपाय योजना करण्यात अधिकारी उदासीन आहेत. – माधुरी मिसाळ, आमदार
“बांधकाम केलेल्या प्लॉटमुळे पाणी अडत नसून सदर येणारे पाणी नैसर्गिक नाला नसून कालव्यातून होणारी पाणी गळती आहे. सदर बांधकाम रस्त्याखाली मोठ्या व्यासाचा पाइप हवा परंतु तेथे लहान व्यासाचा पाइप आहे.” – व्ही.जी.कुलकर्णी, तत्कालीन मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग, मनपा
“सदर जागी वर्षानुवर्षे पाणी वाहत असून सदर पाणी हे ओढा अथवा मनपा जलशुद्धीकरणचे पाणी असावे. कारण, अनेक वर्षांपूर्वी तक्रार आल्यानंतर आम्ही पूर्ण तपासणी केली होती. सदर पाणी कालव्याचे गळतीचे नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो.” – सुभाष शिंदे, पाठबंधारे विभाग