राज्य सरकारचे सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती
* न्यायालयाने यापूर्वी काढलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याचे प्रयत्न
* शिंदे समितीतर्फेही अभ्यास सुरू
पुणे – “मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांना राज्यात कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यातून ते त्यांची भूमिका मांडत आहेत. त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या चाळीस दिवसांची मुदत पुढील दहा दिवसांनी संपणार आहे. त्यानंतर त्यांची ते भूमिका पुन्हा मांडणार आहेत. त्यावेळी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल,’ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.
पवार म्हणाले, “मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वांची मते जाणून घेण्यात आली. सध्याच्या आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला आरक्षण द्यावे, असे त्या बैठकीत ठरले होते. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात यापूर्वी दिलेले आरक्षण नाकारण्यात आले आहे. त्यातील त्रुटी दुरुस्ती करून कायद्याच्या चौकटीत ते कसे बसेल, या संदर्भात काम सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी शिंदे समिती नेमलेली आहे, त्यांचाही अभ्यास सुरू आहे. मात्र, मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यासकरावा, असे काहींचे मत आहे. त्या संदर्भातील काम सुरू आहे. वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.’
पालकमंत्री पदाबाबत वाद वाढवायचा नाही
भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाटील यांनी “पालकमंत्रीपदाचा त्याग करावा लागला’ असे विधान केले होते, त्यावर पवार म्हणाले, “मला या संदर्भात आणखी वाद वाढवायचा नाही. मंत्रीपद देणे खातेवाटप करणे, पालकमंत्रीपद देणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार
असतो. त्यांनी त्यांचा अधिकार वापरलेला आहे.’
“जमीनप्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न’
मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांनंतर स्पष्टीकरण
“निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांनंतर तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहात होता,’ अशी मिश्किल टिपण्णी करत पवार म्हणाले, “मी बोललो नसतो तर वेगळा संदेश गेला असता. माझा काहीही संबंध नसताना मला गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा विषय पुण्यातील असला, तरी तो राज्यस्तरावरचा होता. मी या संदर्भात बोललो नसतो, तर अजित पवार यांची चौकशी करा त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी झाली असती. या संदर्भात नेमक्या कोणत्या गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला, बैठक कोणी घेतली ही माहिती पुढे आली आहे. बोरवणकर यांनी नेमकी हीच वेळ का निवडली याबाबत विचारले पवार म्हणाले की, मला त्याबाबत काहीही माहिती नाही. सध्या मला मिळालेली संधी, जबाबदारी त्यातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे.’