पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल वर्षभरानंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुुरूपदाचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपला. त्यानंतर अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपविण्यात आला. कुलगुरू निवड शोध समिती सप्टेंबरमध्ये स्थापन झाली होती. या समितीने उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. यात एकूण 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जांची छाननी करुन मुलाखतीसाठी 27 पात्र उमेदवारांची यादीही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
या विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा लागली होती. यात पुणे विद्यापीठातीलच सर्वाधिक 11 उमेदवारांचाही समावेश होता. विज्ञान शाखेतील सर्वाधिक उमेदवारही स्पर्धेत होते. दि. 18 व 19 मे रोजी आयआयटी, मुंबई येथे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यातून पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, रसायनशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोले, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी आदी पाच जणांची नावे “शॉर्टलिस्ट’ करण्यात आली व अंतिम निवडीसाठी ती राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठविण्यात आली होती. राज्यपाल तथा कुलपती यांनी पाचही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यामधून अखेर डॉ. सुरेश गोसावी यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अशी आहे डॉ. गोसावी यांची कारकीर्द
डॉ. गोसावी हे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक, स्कूल ऑफ फिजिकल सायन्स विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता. त्यांनी एमएस्सी, पीएच.डी. पदवी मिळविली असून त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर्सही सादर केले आहेत. त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही काही वर्ष काम केलेले आहे. गोसावी यांनी दि.26 ते 28 एप्रिल 2022 या काळात प्रभारी कुलगुरुपदाची धुराही सांभाळली आहे. संचालक, विभाग प्रमुख, वरिष्ठ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक या विविध पदावर कामांचा गोसावी यांना 31 वर्षांचा अनुभव आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याचा आनंद आहे. विद्यापीठाच्या वैभवशाली परंपरेला साजेसे विद्यार्थीकेंद्रीत गुणवत्तापूर्ण व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांमध्ये नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्यावर लक्ष देणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूटशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) विद्यापीठाची रॅंकिंग पूर्ववत करण्याकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. विद्यापीठाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करण्यावर भर देण्यात येईल.
– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ