पुणे – गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तो पळून गेला. याप्रकरणी हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.
पोलीस शिपाई निखील अरविंद पासलकर आणि पोपट काळुसिंग खाडे असे निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी निलंबणाचे आदेश काढले आहेत. मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी दिल्याप्रकरणी स्वाती हिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानूसार आकुर्डी येथे रहाणाऱ्या मार्शल लिलाकर याला अटक करण्यात आली. त्याने मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने इंन्टा खाते उघडून धमकी दिली होती.
दरम्यान, शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्यावर त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी रात्री छातीत दुखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. नाईट राऊंडचे पोलीस निरीक्षक खोमणे यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात सोडून त्यांना योग्य ती काळजी घेत तपासणीसाठी आरोपीला नेण्यास सांगितले होते. दरम्यान दोन्ही कर्मचाऱ्यांची नजर चुकवून आरोपी पळून गेला.
आरोपी आकुर्डी परिसरात येऊन गेला
पळून गेलेला आरोपी सोमवारी आकुर्डी परिसरात येऊन गेला. मात्र तो स्वत:च्या घरी न येता मित्राच्या घरी गेला. त्याने मित्राच्या वडिलांकडे पैसे मागितले. मात्र त्यांच्या खिशात फक्त १३० रुपये होते. हे पैसे घेऊन तो निघुन गेला. एका ठिकाणी तो सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मात्र त्यानंतर तो मुख्य रस्त्याने न जाता गल्लीबोळातून फिरत असल्याने तसेच त्याच्याजवळ मोबाईल नसल्याने माग काढणे अवघड जात आहे.