पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दीक्षांत सोहळ्यावर बंधने आहेत. या अनुषंगाने यंदाच्या 140 व्या तुकडीचा शनिवारी (29 मे) दीक्षांत सोहळा प्रबोधिनीच्या मोजक्या जणांच्या उपस्थितीत होणार असून, युट्युबद्वारे या सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सोहळा पाहता येणार आहे.
खडकवासला परिसरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रबोधिनीत आयोजित करणारा सोहळा दिमाखदार आणि महत्त्वपूर्ण असतो. वर्षातून नोव्हेंबर आणि मे महिन्यात संचलन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
प्रबोधिनीच्या 140 व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे संचलन शनिवारी (29 मे) रोजी होणार आहे. यामध्ये सुमारे 300 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. औपचारिक दीक्षांत सोहळ्याच्या संचलनाचे एनडीएच्या खेत्रपाल मैदानाहून प्रक्षेपण होणार आहे. सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी “पीआरओ एनडीए’या युट्युब चॅनलद्वारे प्रसारण होईल.