पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरच्या पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे असून या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर आशिया खंडातील सर्वात मोठा उभारण्यात येणारा दरी पूलाचे काम सुमारे 100 मिटरपर्यंत पूर्ण झाले असून जुलै 2024 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने ठेवले आहे. मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रक्ल्प हाती
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात.
त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले. या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
याविषयी माहिती देताना एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले की, पुणे़ मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर पुलाचे देखील काम वेगाने सुरू असून 14 पिलर उभारण्यात आले असून आतापर्यंत 100 मीटर उंचीपर्यंतचे पूलाचे काम पूर्ण झाले आहे. जुलै 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
मिसिंग लिंक या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक १80 मीटर उंचीचा केबल ब्रिज उभारणार
– खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता होणार
– १.६ किलोमीटर लांबींचा तर दुसरा ९ किलोमीटर लांबीचा असे दोन बोगदे.
– हे बोगदे पाच पदरी असून त्याची उंची 80 मीटर इतकी आहे.
-जुलै २०२४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उदिष्ट
-काम पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार
प्रवाशांच्या वेळेत व इंधनात बचत होणार