विविध पक्ष्यांची पर्यटकांना भुरळ ः हंगाम संपूनही उजनीकाठ गजबजले
भिगवण – उजनी धरणाच्या पाणवठ्यावर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख पक्षी प्रचंड संख्येने दिसत आहेत. उजनीत यावर्षी प्रचंड पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पाणथळ जागा कमी असल्याने पक्ष्यांची संख्या कमी होती. परंतु जसजसे पाणी कमी होऊ लागले तसतेसे पक्षांची संख्या वाढू लागली आता पाणथळ जागांची व खाद्याची मोठी उपलब्धता यामुळे थंडीचा हंगाम संपला तरी परदेशी पक्षी प्रचंड संख्येने दिसत आहेत.
यावर्षी असलेल्या अधिकच्या पाणीसाठ्यामुळे पाणथळ जागा कमी असल्याने फ्लेमिंगो उशिरा येतील अशी शक्यता होती. परंतु लवकरच या पक्ष्यांचे आगमन झाले आणि हंगाम संपल्यानेही प्रचंड संख्येने परदेशी पक्षी उजनीवर असल्याने पाणवठ्याचा आनंद वाढला आहे. उजनी धरणाचा पाणी फुगवटा देशी-परदेशी पक्षांचे नंदनवन म्हणून ओळखला जातो. पक्षी पाहण्यासाठी पर्यटक धरणावर नौकाविहार करताना दिसत आहेत.
उजनीचे देशी-परदेशी पक्षी
पट्टकदंब या मंगोलियातील पक्षाबरोबर एक टुंड्रा तसेच बदक प्रजातीतील अडई हे अनोखे व या प्रदेशाच्या दृष्टीने नवीन पक्षी अढळून आले आहेत. फ्लेमिंगो, राजहंस, चक्रवाक, नदीसुरय, टिपकेवाला गरुड, मासेमार गरुड, थापट्या बदक, तलवारी बदक, भोरड्या आदी युरोपातून येणाऱ्या पक्षांचे आगमन झाले आहे.
ग्रेलॅक गूज, बारहेडेड गुज किंवा पट्टकदम हा पक्षी तर मंगोलियातून हिमालय ओलांडून भारतात येतो. उजनीचे स्थानिक पक्षी चित्रबलाक, राखी बगळा थंडीमध्ये यांचा डौल पाहणे तर मस्त अनुभव असतो. त्याबरोबरच विविध प्रकारचे बगळे, पाणकावळा, वकिल पक्षी हे सोबतीला असतातच.