पुणे -पुणे बाजार समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर बाजार समितीने प्रस्तावित अद्ययावत बाजार उभारणीसाठी ठेवलेला सुमारे 100 कोटी रुपये किंमतीचा भूखंड काही ठराविक आडत्यांना नाममात्र दरात भाडेकराराने देण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिले आहेत. त्यामुळे कोट्यवधींची बोली लावणाऱ्या आडत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मागील काही दिवसांत बाजार समितीच्या प्रशासनाच्या दुसऱ्या निर्णयाची ही चौकशी होत आहे. यापूर्वी मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे विभागात अनाधिकृत शेड उभारल्याप्रकरणी चौकशीचे आदेश पणन संचालकांनी दिले होते. बाजार समितीने गुलटेकडी मार्केटयार्ड मुख्य प्रवेशद्वार समोरील स. नं 559 अ/2 ब/1 हेक्टर 34 आर म्हणजे सुमारे तीन ते सव्वातीन एकर जागा आहे. ही जागा मोक्याची असून, सध्या या जागेत ट्रक पार्किंग आहे. या जागेची किंमत बाजारभावानुसार अंदाजे 100 कोटी रुपये असतानाही समिती लिलाव न करता ही जागा भाडेकराराने देत आहे. अतिरिक्त आवकेच्या कारणास्तव डाळींब यार्डसाठी अत्यल्प भाडेकराराने ज्या आडत्यांना भूखंड दिला जात आहे, त्यापैकी बहुतांश आडते डाळिंबाचे व्यापार करणारेच नाहीत. तर काही आडत्यांनी शेतकरी, खरेदीदारांच्या पट्टीतून अतिरिक्त पैसे वसूल करत कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची पणन संचालक विनायक कोकरे यांनी दखल घेत डाळींब आडत्यांना भूखंड वाटपाच्या प्रकरणाची चौकशी करून आहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांना दिले आहे.