पुणे -पदवी आणि पदव्युत्तरच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहेत. त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने बीएस्सी तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम वेळेत शिकवून पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सी तृतीय वर्षाचा अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अन्य शाखेचे अभ्यासक्रम पूर्णपणे शिकवून झालेले असल्याने त्यात कोणतीही कपात होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
विद्यापीठातर्फे जून-जुलै महिन्यात द्वितीय सत्राच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठीचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे का नाही याचा आढावा घेण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली होती. त्यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांचा सिलॅबस शिकवून पूर्ण झाला आहे. केवळ बीएस्सीच्या तृतीय वर्षातील शेवटच्या सत्राचा अभ्यासक्रम जूनपर्यंत शिकवून पूर्ण होऊ शकणार नाही. तसेच त्यांची प्रॅक्टिकलची परीक्षाही घ्यायच्या आहेत. त्यामुळे 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवला गेला असल्याने 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. मानविज्ञान विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांबाबतचा आढावा घेऊन दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. अजंली कुरणे यांनी सांगितले.
द्वितीय सत्राच्या परीक्षा बीएस्सी तृतीय वर्षाची परीक्षा 70 टक्के अभ्यासक्रमाची होणार आहे. शाखेतील इतर अभियांत्रिकीसह सर्व विषयाच्या परीक्षेसाठी 100 टक्के अभ्यासक्रम असणार आहे.
– डॉ. मनोहर चासकर,
अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा
बी.एड, शारीरिक शिक्षण यासह इतर अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण झाले आहे, त्यामुळे शिक्षणशास्त्र व आंतर विद्याशाखीय अंतर्गत सर्व विषयासाठी द्वितीय सत्राची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे.
– डॉ. संजीव सोनवणे,
अधिष्ठाता, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा