महापालिकेचा निर्णय : विक्रेत्यांकडूनही सूचना मागवणार
पुणे – सारस बागेबाहेर असलेल्या चौपाटीच्या ठिकाणी आता महापालिका “वॉकिंग प्लाझा’ करणार आहे. त्यामुळे या चौपाटी परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पेशवे उद्यानाजवळ असलेल्या वाहनतळापर्यंतच आपली वाहने नेता येणार आहे. याशिवाय येथील विक्रेत्यांना खुर्च्या आणि समोरील बाजूस छत लावण्यासाठी ठराविक जागा निश्चित करून दिली जाणार आहे. त्यामुळे सारसबागेत येणाऱ्यांना आता या रस्त्यावर मोकळेपणाने वावरता येणार आहे.
शिवाय, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होणार आहेत. याबाबत महापालिका प्रशासन प्रस्ताव तयार करत असून त्यासाठी या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांच्या सूचनाही मागविण्यात येणार आहेत.
सारस बागेबाहेर असलेल्या स्टॉल्सला महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने काही अटी टाकून परवाने दिलेले आहेत. त्यासाठी प्रत्येक स्टॉलला जागाही ठरवून देण्यात आली आहे. या ठिकाणी सुमारे 56 स्टॉल्स आहेत. मात्र, यातील अनेक व्यावसायिकांनी आपल्या स्टॉलसमोर जवळपास 20 ते 25 फूट जागेवर अतिक्रमण करत समोर फरशा टाकून त्यावर छत तसेच समोर खुर्च्या टाकल्या आहेत. त्या पुढील जागेत पार्किंग होते. त्यामुळे चौपाटीसमोर दोन्ही बाजूंच्या या जागा व्यापल्या जातात. त्यामुळे नागरिकांना केवळ 10 ते 12 फूटच रस्ता चालण्यासाठी उपलब्ध होतो.
पालिकेने सूचनाही देऊनही वारंवार स्टॉलधारक हे अतिक्रमण काढत नाहीत. त्यामुळे महापालिकेने हे सगळे स्टॉल 14 मेपासून सील केले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी ते सुरू केले असले, तरी केवळ खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता व्यावसायिकांची बाजू समजून घेत महापालिका येथे वॉकिंग प्लाझा सुरू करणार आहे.
असा आहे प्राथमिक आराखडा
* सारसबाग चौपाटीकडे सणस ग्राऊंड आणि गरवारे बालभवनासमोरून येणाऱ्या रस्त्यावर बोलार्ड लावून नो पार्किंग करणार.
* व्यावसायिक सध्या स्टॉलसमोरची जवळपास 20 ते 25 फूट जागा वापरतात. मात्र, आता त्यांना केवळ 10 फूट जागा वापरास मुभा असेल.
* उर्वरित जागेत व्यावसायिकांना शेड आणि खुर्च्या ठेवण्यास मुभा दिली जाईल.
* या आराखड्यानुसार पादचाऱ्यांसाठी 15 फूट आणखी जागा उपलब्ध होईल.
* या ठिकाणी अनधिकृतपणे लोखंडी पाळणे, इतर खेळणी लावून रस्ता अडविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
* यासाठी आधी महापालिका व्यावसायिकांच्या सूचना मागविणार आहे.