नव्या जलवाहिन्यांवर आढळले तब्बल 700 अनधिकृत नळजोड
सुनील राऊत
पुणे – शहरातील पाणीगळती, चोरी रोखण्यासह पुणेकरांना समान पाणी देण्यासाठी तब्बल अडीच हजार कोटींची समान पाणीपुरवठा योजना पालिकेकडून राबवण्यात येत आहे. या योजनेचे काम पूर्ण होण्याआधीच योजनेला गळती लागली आहे. नव्याने टाकलेल्या जलवाहिन्यांवर तब्बल 700 ठिकाणी अनधिकृत नळजोड घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
या नळजोडांची यादी योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने महापालिकेस दिली आहे. तर, हा प्रकार गंभीर असल्याने महापालिका आयुक्तांनीच थेट या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनलाही धक्का बसला असून, हे नळजोड घेतलेच कसे? याचा शोधही घेण्यात येणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. त्यात पाण्याच्या 83 टाक्या बांधणे, 1,600 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकणे, 2 लाख 80 हजार पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत. हे काम करताना पाणी पुरवठ्याचे झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार जलवाहिन्या तसेच मीटर बसवण्यात येत आहे. त्यासाठी 141 झोन करण्यात आले असून, आतापर्यंत 48 झोनचे काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, पूर्ण झालेल्या झोनचे वॉटर ऑडिट सुरू असून टाकीतून सोडलेले पाणी आणि मीटरद्वारे पोहचलेले पाणी याच्या माहितीवरून गळती शोधली जात आहे. यात जवळपास 700 ठिकाणी अनधिकृत नळजोड नवीन जलवाहिनीवर समोर आले आहे. त्यात अनेकांनी पाणी मीटर बसवल्यानंतर मीटरच्या अलिकडे टॅप करून पाणी चोरले आहे. ज्या मीटरचा पाणीवापर अचानक कमी झाला, तेथे तपासणी केली असता हा प्रकार समोर आला.
दि. 10 डिसेंबरपर्यंत कारवाई करा : आयुक्त
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मागील आठवड्यात पाणीपुरवठा योजनेची बैठक घेतली. यात पाण्याचे ऑडिट करताना सापडलेल्या पाणीचोरीची माहिती तसेच अनधिकृत नळजोडांची यादीच सादर केली आहे. त्यावर पाणीपुरवठा विभागाने दि. 10 डिसेंबरपूर्वी पोलीस बंदोबस्तात अनधिकृत नळजोडांवर कारवाई करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित उपअभियंता तसेच कार्यकारी अभियत्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाने दिले आहेत.