पुणे –पुणे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तातडीने तात्पुरत्या स्वरुपात दहा हजार रुपये सेवानिवृती वेतन (पेन्शन) देण्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती वेतन देणे बंधनकारक असते. मात्र सेवा पुस्तकातील नोंदी वेळच्या वेळी न केल्याने तांत्रिक कारणाने कर्मचाऱ्यांना ते मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे सेवकांच्या कुटुंबीयांना आर्थिक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर हक्काचे पैसे मिळेपर्यंत तातडीने आणि तात्पुरती उपाययोजना म्हणून प्रतिमहिना दहा हजार रुपये पेन्शन चालू करण्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे रासने यांनी सांगितले.
शिवछत्रपती सन्मान विजेत्यांचा होणार गौरव
पुणे शहरातील राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या 6 खेळाडू आणि 13 क्रीडा मार्गदर्शकांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन महापालिकेच्या वतीने गौरव करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी महापालिका हद्दीतील खेळाडू आणि मार्गदर्शकांचा गौरव करण्यास मान्यता देण्यात आली होती. 19 जणांनी नव्याने अर्ज केले होते. त्यांचा गौरव करण्यासाठी 12 लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याचे रासने म्हणाले.