पुणे – गावठाण भागातील अनेक वाडे आणि जुन्या सोसायट्यांचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. युडीसीपीआर नियमावलीमुळे अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या नियमावलीनुसार बांधकाम 15 मीटर उंचीच्यावर गेल्यास एक मीटर साइड मार्जिन सोडण्याची अट घालण्यात आल्याने पुनर्विकसन करताना अडचण निर्माण होत आहे.
परिणामी, शहरातील मध्यवर्ती पेठांचा बहुतांश भाग असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून राज्य शासनाने एकात्मिक बांधकाम विकास नियमावलीत या भागातील नियम शिथील करावेत अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याशिवाय, शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पुरातत्व विभागाच्या नियमावलीनुसार या वस्तूंच्या 100 मीटर परिसरातील बांधकाम आणि दुरुस्तीला परवानगी मिळत नाही. शनिवार वाडा परिसरातील अनेक मिळकतींना देखील याचा फटका बसत आहे. दरम्यान, याबाबत “एएमएएसआर’ कायद्यात सुधारणा करण्याचे प्रलंबित विधेयक संमत होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती रासने यांनी दिली.