विद्रुपीकरण करणाऱ्यांना आवरा; प्रशासनाचे दुर्लक्ष
कोथरूड – वनाज ते गरवारे महाविद्यालयदरम्यान मेट्रो मार्गिकेच्या खांबांवर राजकीय फ्लेक्स लावण्याचे प्रकार सुरू झाल्याने मेट्रो मार्गिकेचे विद्रुपीकरण होत आहे. शहर, उपनगरांतील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, प्रमुख चौक अगदी स्वच्छतागृहांच्या भिंतींवरही राजकीय फ्लेक्स लावले जातात.
राजकीय दबावातून महापालिकेचा आकाशचिन्ह आणि परवाना विभागातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच आता मेट्रो मार्गिकेच्या खांबांबरही जाहिराती लावण्याचे धाडस संबंधित लोक करू लागले आहेत. यातून शहर, उपनगरांचे मोठे विद्रुपीकरण होण्याचा धोका आहे. मेट्रो मार्गिकेच्या खांबांवर जाहिराती लावणाऱ्यांवर मेट्रो तसेच महापालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे ठरत आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय मेट्रो मार्गिकेच्या खांबांवर राजकीय फ्लेक्स लावण्यास सुरुवात झाली आहे.
खासगी उद्योग-व्यवसायाच्या जाहिराती दिसू लागल्या आहेत. अशा जाहिराती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन तसेच आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून तातडीने हटविण्यात याव्यात, अशी अपेक्षा असताना हा प्रकार सर्रास सुरू आहे. कारवाई होत नसल्याने येत्या काही दिवसांत मेट्रोचे सर्व खांब तसेच मेट्रोचे डबे, स्थानके, सरकते जिने बेकायदा जाहिरातींनी भरलेले दिसतील, त्यामुळे हे प्रकार रोखण्याकरिता वेळेत कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
मेट्रोच्या खांबांवर अनधिकृत फ्लेक्स तर काही ठिक़ाणी जाहिरातीच चिटविल्या जात आहेत, त्यामुळे मेट्रोच्या खांबांचे विद्रुपीकरण होत आहे, ते वेळीच रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. याबाबतचे निवेदन पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक व्रिजेश दीक्षित यांना दिले आहे, त्यानुसार संबंधितावर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.
– संदीप खर्डेकर, अध्यक्ष, क्रिएटीव्ह फाउंडेशन