पुणे (अविनाश ढगे) -कोणी एम. ई. इलेक्ट्रोनिक ऍण्ड टेलिकम्युनिकेशन…कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर…कोणी बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअर… तर कोणी एमबीए आणि एलएलबी उत्तीर्ण हे एखाद्या आयटी कंपनी अथवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचे कर्मचारी नाहीत; तर हे आहेत पीएमपीचे वाहक आणि चालक….केवळ हाताला रोजगार नसल्याने आणि घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने इंजिनिअरिंग, व्यवसाय व्यवस्थापन तर वकीलीचे शिक्षण घेऊन तर काहींनी अर्धवट सोडून अनेकांनी पीएमपीची नोकरी स्वीकारलेली आहे. पीएमपीच्या वाहक आणि चालकांत असे तब्बल 225 उच्चशिक्षित कार्यरत आहेत. या उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांचा वापर पीएमपीकडून पहिल्यांदाच त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना काम देत करून घेतला जाणार आहे. पीएमपीचा पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी अशा कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. या दोन्ही शहरात सुमारे 1650 हून अधिक बसमार्फत सेवा दिली जाते. यासाठी पीएमपीत 2 हजार 296 चालक आणि 4 हजार 776 वाहक आहेत. पण, चालक आणि वाहकांमध्ये अनेक जण उच्चशिक्षित कर्मचारी असल्याचे पीएमपीचे अध्यक्ष बकोरिया यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा पीएमपीच्या प्रशासकीय कामकाजात वापर करून घेण्यासाठी बकोरिया यांनी पीएमपीच्या अधिकाऱ्यांना पीएमपीत एकूण किती उच्चशिक्षित कर्मचारी आहेत. याची माहिती घेण्याचे आदेश 24 नोव्हेंबर रोजी दिले होते. कर्मचाऱ्यांना ते काम करत असलेल्या डेपोमध्ये कागदपत्रे जमा करायची होते. प्रत्येक डेपो व्यवस्थापकाने त्यांची माहिती संकलित करून पीएमपीच्या जनसंपर्क अधिकारी विभागाला पाठवायची होती. या माहीतीनुसार, एम. ई. इलेक्ट्रोनिक ऍण्ड टेलिकम्युनिकेशन, सॉफ्टवेअर इंजिनिअर, बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअर, डिप्लोमा, एमबीए, पीएच. डी. आणि एमपीएससी मुख्य परीक्षेस पात्र झालेले कर्मचारी आहेत.
वाहक झाले अधिकारी
पीएमपीत मागील दहा वर्षांत अनेक अधिकारी होऊन बाहेर पडले आहेत. चालक आणि वाहक म्हणून काम करणारे बरेच कर्मचारी सीए, पीएसआय, एसटीआय अशा विविध पदांवर कामाला लागले आहेत. तसेच काही चालक आणि वाहकांच्या पत्नी देखील अधिकारी झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
प्रशासनात अनेक पदे रिक्त आहेत. पीएमपीत चालक आणि वाहक पदांवर काम करणाऱ्या उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून घेणार आहे. त्यामुळे पीएमपीचा कारभार जलद आणि पारदर्शक होईल.
– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी