हडपसर – मांजरी बुद्रुक रेल्वे गेट क्रमांक तीनवर उड्डाणपूल उभारण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. मात्र, गेली अनेक महिने रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रेल्वेच्या रुळावर असलेल्या भागाच्या उड्डाणपुलाचे काम रेंगाळले आहे. दरम्यान पादचारी अंडरपासच्या कामाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरवात होणार आहे. त्यानंतर या भुयारी मार्गातून पायी ये-जा करणे तसेच दुचाकी चालकांना प्रवास सुरू करता येणार आहे.
मांजरी बुद्रुक येथे रेल्वे उड्डाणपूल व पादचारी अंडरपासच्या कामाविषयी माहिती देताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, रेल्वे ओव्हर ब्रिज हे विशेष कौशल्याचे काम असल्याने हा अधिकचा वेळ लागत आहे. पण हे काम पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. सध्या उड्डाणपुलाचे रेल्वे हद्दीतील पिलर्सचे काम पूर्ण झाले आहे. फॅब्रिकेशनचे कामही पूर्ण होत आले आहे. ३ गर्डर स्पॅन पैकी १ रेल्वे करणार असून त्याचे काम वर्कशॉपमध्ये सुरू आहे. उर्वरित २ गर्डर स्पॅन सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.
साधारणपणे ३ ते ४ महिन्यात उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल. मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपूल व पादचारी अंडरपासच्या कामाची सद्यस्थिती विषयी पुणे विभागीय रेल्वेचे उपमुख्य अभियंता सचिन पाटील यांनी ही माहिती दिली असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
मांजरी बुद्रुक रेल्वे गेटवर उड्डाणपूल पूर्ण होत आहे. याशिवाय येथील पादचारी अंडरपासच्या कामासाठी २६ व २७ मे रोजी ७ तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यासाठीची परवानगी प्राप्त झाली असून त्याच वेळेस अंडरपासचे काम केले जाणार आहे. – डॉ. अमोल कोल्हे (खासदार, शिरूर लोकसभा)