पुणे – निवासी डॉक्टरांसाठी पुरेशी वसतिगृहे असावीत, त्यांची दुरुस्ती व्हावी यांसह प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची हेळसांड थांबवावी आणि डॉक्टरांची पदे भरण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी बी. जे. वैद्यकीय तथा ससून रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (मार्ड) चे डॉक्टर सोमवारपासून अनिर्बंध काळासाठी संपावर गेले. या संपाचा फटका रुग्णांना बसला असून, बाह्यरुग्ण विभागासह (ओपीडी) आंतररुग्ण विभागातील रुग्णसेवा बाधित झाली. तसेच तातडीचे वगळता इतर शस्त्रक्रियांच्या रुग्णांना दाखल करुन न घेतल्याने परत जावे लागले. तसेच, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. दरम्यान, रुग्णसेवेवर कोणताही परिणाम न झाल्याचा दावा ससून प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी राज्यभरातील 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ससूनमधील 600 निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. मात्र, तातडीच्या रुग्णांसाठी या 600 पैकी शंभर ते सव्वाशे डॉक्टर सेवेत होते. अतिदक्षता विभाग तसेच तातडीचे रुग्ण वगळता इतर सर्व विभागांत काम बंद करण्यात आले होते.
अनेकांना सोमवारी निवासी डॉक्टरांचा संप असल्याचे माहीत नसल्याने अनेक रुग्ण ससूनमध्ये बाह्यरुग्ण विभागात आले. दररोज होणाऱ्या सुमारे अडीच हजार तपासण्यांमधून 10-15 टक्के रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते. बाह्यरुग्ण विभागात निवासी डॉक्टर रुग्णांना तपासत असतात; परंतु ओपीडीमध्ये निवासी डॉक्टरांअभावी वरिष्ठ निवासी डॉक्टर, अध्यापक, प्राध्यापक यांच्यावर रुग्ण तपासणीचा ताण आला आणि परिणामी रुग्ण तपासण्यासाठी उशीर लागत होता.
केवळ बाह्यरुग्ण विभागाच नव्हे, तर आंतररुग्ण विभागातील रुग्णांवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. दररोज येथे एका युनिटद्वारे 15 ते 20 रुग्ण उपचार तसेच शस्त्रक्रियेसाठी ऍडमिट होत असतात. त्यापैकी तातडीचे उपचार आवश्यक असलेले म्हणजे एक ते दोनच टक्के रुग्णांना ऍडमिट करून घेण्यात आले. तर, नियोजित शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना परत पाठवण्यात आले.
नर्सेस, वरिष्ठ डॉक्टरांवर ताण
निवासी डॉक्टर हे वॉर्डमध्येही रुग्णांना उपचार देण्याचे काम करत असतात. एका युनिटला त्यांची संख्या आठ ते नऊ इतकी असते. परंतू संपामुळे रुग्णांचा ताण नर्सेस, अध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्यावर पडला. त्यामुळे वॉर्डमध्येही रुग्णसेवा विस्कळित झाली.
पुण्यात हॉस्टेल दुरुस्तीची तसेच त्यांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. ससूनमधील 600 पैकी तातडीच्या सर्व सेवा तसेच आयसीयुमधील रुग्णांना सेवा देण्यात आली. त्यासाठी 100 डॉक्टर कामावर होते आणि इतर संपावर होते. याबाबतच्या मागण्यांचे निवेदन अधिष्ठातांना दिले आहे.
– डॉ. किरण घुगे, सचिव, मार्ड संघटना
संपकऱ्यांच्या मागण्या…
हॉस्टेल दुरूस्त करा, त्यांची क्षमता वाढवा
वैद्यकीय महाविद्यालयांत 1432 पदनिर्मिती करावी
वसतिगृहांची दुरुस्ती करावी
निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची हेळसांड थांबवावी
सहयोगी, सहाय्यक प्राध्यापकांची पदे तातडीने भरावीत