Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच 1 फेब्रुवारीला सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पुढील आर्थिक वर्ष 2024-25 साठी हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. मात्र तरीही बजेट तयार करताना तेवढीच मेहनत घ्यावी लागते. यंदाच्या बजेटकडून सर्वसामान्य जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत कारण मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सहावा अर्थसंकल्प एक विशेष टीम तयार करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन व्यतिरिक्त, या बजेट टीममध्ये नवरत्नांचा समावेश आहे, जे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. याच दिग्गज व्यक्तींची ओळख करून घेऊयात…
टीम लीडर निर्मला सीतारामन
2019 पासून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या भारताच्या इतिहासातील दुसऱ्या अर्थमंत्री ठरणार आहेत. यापूर्वी मोरारजी देसाई यांनीही ५ पूर्ण आणि १ अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. 1 फेब्रुवारीला सीतारामन या मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांना मागे टाकणार आहेत.
या सर्वांना सलग ५ वर्षे अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. देशातील आघाडीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात वाणिज्य आणि संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली. त्या कर्नाटकातून राज्यसभेच्या खासदार म्हणून काम करत आहेत.
टीव्ही सोमनाथन
तामिळनाडूचे आयएएस अधिकारी टीव्ही सोमनाथन हे सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वित्त सचिवाचीही जबाबदारी आहे. 1987 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सोमनाथन यांनी एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2017 पर्यंत पंतप्रधान कार्यालयात काम केले. ते पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. 2020 मध्ये ते केंद्रीय अर्थ मंत्रालयात खर्च सचिव झाले. तेव्हापासून ते बजेट बनवण्याच्या प्रक्रियेशी जवळून जोडले गेले आहेत.
अजय सेठ
अजय सेठ, कर्नाटक केडरमधील 1987 बॅचचे आयएएस अधिकारी, वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहेत. ते 2021 मध्ये वित्त मंत्रालयात आले आणि त्यांनी मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाच्या अर्थसंकल्प विभागाचे नेतृत्व केले. गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 बैठकीत ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
तुहीन कांत पांडे
तुहिन कांता पांडे, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागातील सचिव (DIPAM), एअर इंडियाचे खाजगीकरण आणि LIC च्या IPO मध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी ओळखले जाते. पांडे हे ओडिशा केडरमधील 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
संजय मल्होत्रा
राजस्थान केडरमधील १९९० बॅचचे अधिकारी संजय मल्होत्रा सध्या महसूल सचिव आहेत. आयएएस परीक्षेत ते त्यांच्या बॅचचे टॉपर होते. याआधी ते वित्तीय सेवा विभागात म्हणजेच बँकिंग विभागात सचिव होते. बजेट प्रक्रियेत कर महसूल वाढवण्याची जबाबदारी मल्होत्रा सांभाळत आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग ब मसुदा तयार करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.
विवेक जोशी
अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पावरील सल्लागारांच्या गटातील नवख्या सदस्यांमध्ये विवेक जोशी यांची गणना होते. नोव्हेंबर 2022 मध्ये ते वित्त मंत्रालयात वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणून रुजू झाले. हरियाणा केडरमधील 1989 च्या बॅचचे अधिकारी असलेले जोशी यापूर्वी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते. बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम यासारख्या क्षेत्रांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी जोशी हे अर्थमंत्र्यांचे सहाय्यक असणार आहेत.
नितीन गुप्ता
भारतीय महसूल सेवेतील आयकर विभागाचे अधिकारी असलेले नितीन गुप्ता हे सध्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ किंवा CBDT चे अध्यक्ष आहेत. अर्थसंकल्पात प्राप्तिकर, कॉर्पोरेट कर आणि प्रत्यक्ष कराशी संबंधित सर्व प्रस्ताव तयार करण्यात ते मदत करणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात त्यांचा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
संजय कुमार अग्रवाल
भारतीय महसूल सेवेतील GST आणि सीमाशुल्क विभागाचे अधिकारी सध्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष आहेत. या अर्थसंकल्पात समाविष्ट केलेले सर्व अप्रत्यक्ष कर संबंधित प्रस्ताव त्यांच्या टेबलवरूनच पुढे जातील. अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटीतील बदल आणि जीएसटीशी संबंधित प्रस्तावांवर ते लक्ष ठेवणार आहेत.
व्ही अनंत नागेश्वरन
व्ही अनंत नागेश्वरन हे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. लेखक आणि शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवर ते सीतारामन यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी एक आहेत. जागतिक उलथापालथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो याचेही ते निरीक्षण करतात.
आशिष वाचानी
तामिळनाडू केडरमधील 1997 च्या बॅचचे आयएसएस अधिकारी सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बजेट विभागात अतिरिक्त सचिव आहेत. एक प्रकारे ते देशाचे मुख्य अर्थसंकल्पीय अधिकारी आहेत. काही बजेटसाठी ते अनुभवी अधिकारी मानले जातात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक मॅनेजमेंट आणि गव्हर्नन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या वाचानी यांना धोरण तयार करण्याचा आणि अंमलबजावणीचा मोठा अनुभव आहे.