वाल्हे – दैनिक “प्रभात’च्या वृत्ताची तसेच, सरपंच अमोल खवले आणि सेवा दलाचे हनुमंत पवार यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन, गॅरेजमधील रुग्णवाहिका वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी, वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले, राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे नव्याने लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रेय पवार, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुका उपाध्यक्ष शंकर यादव, दीपक कुमठेकर, सामाजिक कार्यकर्ते अभिजित पवार, भाजपचे नेते नीलेश जगताप, तुषार भुजबळ, शैलेंद्र भोसले, हनुमंत भुजबळ, सिकंदर इनामदार, संदीप भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दै. “प्रभात’ने 30 नोव्हेंबरला “रुग्णवाहिका 16 महिन्यांपासून गॅरेजमध्येच… बील अदा न केल्याने पुरंदरमधील 10 गावे सेवेपासून वंचित : प्रशासनाचे दुर्लक्ष’, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची त्वरीत दखल घेण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्टोबर 2020 मध्ये वाल्हे (ता. पुरंदर) प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या रुग्णवाहिकेचा अपघात होऊन ती रुग्णवाहिका मागील 16 महिन्यांपासून नादुरुस्त होती.
रुग्णवाहिका खरेदीसाठी वाल्हे ग्रामपंचायतीसह दौंडज, हरणी, पिंगोरी, जेऊर, पिसुर्टी, राख, नावळी, वागदरवाडी, सुकलवाडी आदी ग्रामपंचायतींनी 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून दिला होता. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 11 गावांचा समावेश असून, त्यामध्ये चार उपकेंद्रे कार्यान्वित आहेत.
येथे उपचारांसाठी नेहमीच रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सद्यःस्थितीत 2005 मॉडेलची सुमो गाडी रुग्णवाहिका म्हणून सेवेत होती. सद्यःस्थितीत जुनाट रुग्णवाहिकेतून रुग्णांना जीव धोक्यात घालून, नाइलाजास्तव प्रवास करावा लागत होता. रुग्णवाहिका लोकार्पणावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे यांनी आभार मानले.