विमा कंपनीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांची फसवणूक
पूणे : नामांकित जीवन विमा कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून पन्नास लाखांचा विमा काढल्यानंतर झिरो टक्के व्याज दराने पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांना आर्थिक गंडा घालणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा दत्तवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईतील मुलूंड परिसरात हे कॉल सेंटर सुरू होते. येथून देशभरातील नागरिकांना गंडा घालण्यात येत होता. मागील काही महिन्यात शेकडो नागरिकांची करोडा रुपयांची फसवणूक कॉल सेंटरच्या माध्यमातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, तेथे काम करणाऱ्या इतर मुला-मुलींना चौकशीसाठी दत्तवाडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. रोहित संतोष पांडे (वय 24, रा. किसननगर नं.1 वागळे इस्टेट ठाणे) आणि दानेश रवींद्र ब्रिद (वय 25, रा. अंबरनाथ वेस्ट ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तेथून पोलिसांनी कॉल करण्यासाठी वापरण्यात येणारे चाळीस मोबाइल, संगणकाच्या हार्ड डिस्क, एक एनव्हीआर व काही कागदपत्रे जप्त केली आहेत. कॉल सेंटरचा मुख्य मालक फरार झाला आहे.
पुणे शहरातील एका महिलेची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचा गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल होता. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पथक तपास करत होते. त्यांनी आरोपी वापरत असलेला मोबाइल क्रमांक, कंपनीचे डोमेन नेम, फसवणुकीची रक्कम ज्या खात्यावर जमा झाली त्याची माहिती तांत्रिक विश्लेषनाद्वारे प्राप्त केली होती. त्यावेळी फसवणूक करणारे कॉलसेंटर हे मुंबईत मुलूंड येथे असल्याचे समजले.
दत्तवाडी पोलिसांच्या सायबर पथकाने कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी 43 मुले, मुली, ऑफिसमध्ये बसून कॉल करताना दिसून आले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक अक्षय सरवदे, कर्मचारी काशिनाथ कोळेकर, जगदिश खेडकर, अनुप पंडित, सुर्या जाधव, प्रसाद पोतदार यांनी केली.
अशी होती गुन्ह्याची पद्धत
राज्यातील विविध शहरांतील नागरिकांना फोन कॉलद्वारे नामांकित विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगून विम्यावर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने फोन करत होते. त्यानंतर नागरिकांचे आधार कार्ड, कॅन्सल चेक, फोटो व्हॉट्सअपवर घेऊन लोनच्या सहा महिन्यांचे प्रिमियम अडीच लाख रुपये होत असल्याचे सांगून, त्यापैकी सव्वा लाख रुपये भरण्यास सांगून फसवणूक करत होते.