लातूर – पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारने वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे. पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आयआयटीएम) या संस्थेने हे अॅप विकसित केले आहे.
साधारणतः मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावतो. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यामध्ये विशेषतः शेतकरी व शेतमजुरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वीजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान शेतकऱ्यांना व नागरिकांना काही वेळ अगोदर समजावे, यासाठी दामिनी अॅप उपयोगी ठरत आहे.
दामिनी अॅपसाठी आयआयटीएमने लाइटनिंग लोकेशन नेटवर्क हे मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसविण्यात आले आहेत. या अॅपमुळे शेतकरी, नागरिकांना वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे पंधरा मिनिट ते अर्धा तास आधी अचूक अंदाज मिळू शकतो.
दामिनी अॅप फोनमध्ये कसे घ्यावे?
गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘damini’ असे टाईप केल्यानंतर हे अॅप दिसेल. ते आपल्या फोन मध्ये डाऊनलोड करून घ्यावे.