पुणे – एकतर्फी प्रेमातून बिबवेवाडी परिसरामध्ये 13 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा निघृण खून करून शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ माजवलेल्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिध्द फौजदारी वकील ऍड. हेमंत झंजाड यांची निवड झाली आहे. ते पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आहेत.
12 ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडी येथील एका लॉन्सवर हा प्रकार घडला. त्या मुलीने प्रेमास नकार दिला आणि फोनवर बोलण्यास टाळाटाळ केल्यामुळे शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत (वय 22) याने क्रुर पद्धतीने तब्बल 42 वार करून हा खून केला होता. या प्रकरणाची चर्चा विधानसभेतही झाली होती.
ऍड. झंजाड हे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय येथे प्रॅक्टीस करत आहेत. त्यांनी शहर व जिल्ह्यात गाजलेले सांगवीतील तुषार ढोरे खून प्रकरण, दौंड येथील पोलीस संजय शिंदे कडून करण्यात आलेल्या दुहेरी खून प्रकरण, पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार खून प्रकरण, लोणावळ्यातील पोलीस अतुल साठे यांच्या खुनाचा प्रयत्नाच्या प्रकरणासह विविध खटल्यात कामकाज पाहिले आहे.