औंध (अभिराज भडकवाड) – महापालिकेच्या निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागात विविध विकासकामे करण्यात आली. यामध्ये रस्ते, उद्यान, चौक यासह मूलभूत सोयीसुविधांचीही कामे आहेत. ही कामे करताना ते आपणच केल्याचे दर्शविण्यासाठी “संकल्पना’ या गोंडस शब्दाचा आधार घेत असे फलक प्रत्येक कामाच्या ठिकाणी लावण्यात आले.
विशेष म्हणजे रस्ते, चौक यांना आपल्या सग्या-सोयऱ्यांची नावे देण्याचे प्रस्तावही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी दिले. यातील कुरघोडीच्या राजकारणातून नगरसेवकांमध्ये वाद झाल्याची वस्तुस्थिती असताना प्रभागाची रचनाच बदलल्याने प्रभागाच्या जुन्या भागात लावण्यात आलेले “संकल्पना’चे फलक निरूपयोगी ठरणार आहेत. तर, नव्या भागात तेथील नगरसेवकांच्या “संकल्पने’चे झळकत असल्याने अशा भागात निवडणुकीचा प्रचार करताना अनेकांची “पाटी कोरीच’ असणार आहे. त्यामुळे संकल्पना, नावांचे प्रस्ताव याकरीता नगरसेवकांनी घातलेले वाद निरर्थक ठरणार आहेत.
महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असून एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. नगरसेवक पदाची मुदत संपुष्टात येण्यास अवघे 20 दिवस राहिले आहेत. यामुळे प्रभागात निधी खर्च करीत उरलीसुरली कामे उकरण्यावर नगरसेवकांचा भर आहे. गेल्या जाहिरानाम्यातील कामे राहिली आहेत, अशा कामांची डागडुजी करण्यावरही अनेकांचा भर आहे.
महापालिका निवडणूक जवळ आल्याने वरिष्ठ ते कनिष्ठ पातळीवरील राजकारण ढवळून निघत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मात्र, आता पालिकेची मुदत संपुष्टात येत असल्याने उरलेल्या दिवसांत राजकारणापेक्षा आपल्या प्रभागावर अनेकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणुकीची चाहूल लागल्याने विकासकामांनी वेग घेतला आहे. त्यातच नव्याने झालेल्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकीसाठीची आखणी केली जात आहे. नव्या प्रभागात जावून लढण्याची तयारीही अनेकांनी केली आहे. याच कारणातून विरोधकांमध्ये “मित्र’ शोधण्याचे धोरणही अनेकांकडून अवलंबले जात आहे.
मुदत संपण्यापूर्वी…
महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपण्यापूर्वीची शेवटची मुख्यसभा होण्यापूर्वी निधी आणण्यावर नगरसेवकांचा जोर असून त्यातून नव्या प्रभागात काही कामे करता येतील का? याबाबतही प्रयत्न केले जात आहेत. अखेरच्या दिवसांत प्रभागाच्या नव्या भागात केवळ विकासकामांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.