पुणे –महापालिकेच्या कैलास स्मशानभूमीत अंत्यविधी वेळी चितेवर टाकण्यात आलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याच्या घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून महापालिकेकडे अंत्यविधीसाठी ठेकेदारासाठी काही नियमावली आहे का? तसेच ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांसंबंधी काही माहिती विचारली होती. मात्र, पालिकेच्या विद्युत विभागाने थेट उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली आहे. तसेच स्मशानभूमीच्या व्यवस्थापनाचा विद्युत विभागाशी काही संबंध नसून याप्रकरणी ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उत्तर देत चक्क पोलिसांच्या प्रश्नावलीचाच चेंडू केला आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत महापालिका प्रशासन काहीच गंभीर नसल्याचे समोर आले आहे.
पालिकेच्या स्मशानभूमीत 45वर्षीय व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू असताना पेट्रोल टाकले जात होते. त्यावेळी त्याचा भडका उडून 11 जण भाजले. त्यात तिघांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी बंडगार्डन पोलिसांनी सुरू केली असून अंत्यविधीच्या कामाच्या निविदेची माहिती मागवली होती. त्यावर विद्युत विभागाने अंत्यविधीसाठी निविदा काढलेली नाही, त्यामुळे याची प्रमाणित प्रत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर दिले आहे.अंत्यविधीबाबत ठेकेदारांसाठी नियमावली होती का? अशा सहा ते सात प्रश्नांची यादी पालिकेस पाठवली होती. मात्र, यातील कोणत्याही पक्षाचे स्पष्ट उत्तर न देता विद्युत विभागाकडून ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे बोट दाखवित पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पोलिसांचीच बोळवण केली आहे.