पुणे – धायरी गावात जाण्यासाठी सिंहगड रस्त्यावरून एकच रस्ता आहे. महापालिकेकडून 23 गावांसाठीच्या 2008च्या विकास आराखड्यात धायरी गावासाठी प्रस्तावित केलेल्या 30 मीटर रस्त्यासाठी पालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
धायरी उड्डाणपूलाच्या 100 मीटर पुढे गेल्यानंतर मॅक्डोनाल्डच्या समोरील बाजूस असलेल्या फर्निचर दुकानांपासून सावित्री गार्डनपर्यंत सुमारे 1200 मीटर लांबीचा हा रस्ता आहे. सध्यस्थितीत सुरूवातीलाच तो 9 मीटर रूंद आणि अवघा 70 ते 80 मीटर प्रत्यक्ष जागेवर तुकड्या तुकड्यात आहे. त्यामुळे हा रस्ता विकसित झाल्यास धायरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, या रस्त्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकने यांनी नुकतीच जागामालकांची बैठक घेतली, त्यांच्याकडून नाल्याची हद्द निश्चित करून त्यानंतर रस्त्याची आखणी करण्यावर प्रशासन व जागा मालकांचे एकमत झाले आहे. त्यामुळे हा रखडलेला रस्ता मार्गी लागणार आहे.
रस्ता आखणीला विरोध?
रस्ता सुमारे 1200 मीटर लाबींचा असून यात जवळपास 150 जागा मालक आहेत. महापालिकेने हा रस्ता 30 मीटर रुंदीचा आखलेला आहे. शेतीची जागा जात असल्याने या आखणीला काही जागा मालकांचा विरोध आहे. काही जागामालकांची सर्वच जमीन घेतली जात असल्याने सर्वांची समान जागा न घेता पर्याय आखावा, अशी मागणी होत असून सध्याच्या रस्ता आखणीला विरोध होत आहे.
व्यवस्थित जागा मोजणी करून घ्यावी यासह काही मुद्दे बैठकीतही मांडले गेले आहेत. त्यानंतर पालिकेच्या वतीने त्यावर तोडगा म्हणून या रस्त्याचा नकाशा, फाळणी डीपीवर इम्पोज करून आखणी निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे.
“जागा देण्याबाबत अनेक गावकरी सकारात्मक आहेत. मात्र, काही मालकांकडून जास्त जागा जात असल्याचे आक्षेप घेण्यात आला आहे. त्यानुसार, डीपी रस्त्याची आखणी गाव नकाशा, फाळणी डीपीवर इम्पोज करून रस्त्याची आणखी निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. हे काम दिवाळीनंतर केले जाणार आहे. हा रस्ता झाल्यास धायरीची वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.” – अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग