पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील वादग्रस्त कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेेने अटक केली. शेवते हा मागील वीस वर्षांपासून सर्जरी विभागात कामाला आहे. या विभागाचे प्रमुख म्हणून अधिष्ठाता (डीन) डॉ. संजीव ठाकूर काम करत होते. यामुळे डॉ. ठाकूर यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.
ललित पाटीलला पळून जाण्यास आणि ससूनमध्ये असताना व्हीआयपी ट्रीटमेंट देत मदत केल्याचा आरोप डॉ. ठाकूर यांच्यावर आहे. उच्च न्यायालयातील एका प्रकरणात दि. १० नोव्हेंबर रोजी डॉ.ठाकूर यांची अधिष्ठाता पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.
ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, त्याने रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप धंगेकर यांनी नुकताच केला होता. गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता.
ललितने ससून रुग्णालयातून मेफेड्रोन विक्रीचे व्यवहार केले होते. त्यासाठी त्याने शेवतेला पैसे दिले होते. शेवते मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्याने ससूनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. या प्रकरणात ललितसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी मोक्का कारवाई केली असून, ते सर्व येरवडा कारागृहात आहेत.
– प्राथमिक चौकशीत अनेक गंभीर बाबी उघड
– मेफेड्रोन विक्रीतही मध्यस्त असल्याचा संशय
वॉर्ड क्र. १६ मधील १७ कर्मचाऱ्यांची चौकशी
ललित पाटील पलायनप्रकरणात गुन्हे शाखेने शुक्रवारी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये कार्यरत असलेल्या तब्बल १७ कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यामध्ये परिचारिका, वॉर्ड बॉय, शिपाई यांचा समावेश आहे . ललित पाटीलला कशा प्रकारे मदत केली जात होती, व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचे आदेश कोणाचे होते, कोणत्या सुविधा पुरविल्या जात होत्या, तसेच तो नियमीतपणे हॉटेलच्या वाऱ्या कशा करत होता, आदींची विचारणा या कर्मचाऱ्यांना करण्यात आली. या सर्वांच्या चौकशीमध्ये शेवतेचे नाव पुढे आल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेवतेचे कारनामे अचंबित करणारे
ससूनमध्ये नियमबाह्य कोणतेही काम करायचे असेल, तर ते शेवतेमार्फतच केले जात होते, असेही समोर आले आहे. शेवतेचा शब्द अंतिम असायचा. सर्व वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांना तो मागील अनेक वर्षे हाताशी धरुन होता. त्याचा दबदबा असल्यामुळे अनेक प्रामाणिक डॉक्टर मात्र त्याच्या विरोधात होते. ललित पाटील प्रकरण घडल्यावर अनेक डॉक्टरांनी उघडउघड शेवतेचे नाव घेण्यास सुरुवात केली होती.
यानंतर शेवते काही काळ गायब होता. तर अंगावरील लाखो रुपयांचे दागिने काढून तो साधेपणाने वावरू लागला होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने रोख २२ लाख रुपये देऊन आलिशान एसयूव्ही खरेदी केली आहे. तर त्याच्याकडे असलेल्या संपत्तीचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
“प्रतिअधिष्ठाता’ रडारवर
तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर रजेवर किंवा बाहेरगावी असल्यास एक बीएएमएस डॉक्टर त्यांची सर्व सूत्रे हाती घ्यायचा.. हा डॉक्टर स्वत: डीन म्हणूनच वावरत होता. इतर डॉक्टरांना आदेश देणे, दमदाटी करणे व अनेक बेकायदा कामे करण्याचे प्रकार त्याच्याकडून सुरू होते. डॉ. ठाकूर यांच्या मुलाचा तो चांगला मित्र आहे. शेवतेला अटक केल्यावर हा डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर आला आहे. पोलिसांनी चौकशी केलेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडूनही त्याचे नाव आल्याचे सूत्रांनी सांगितले.
“ललित पाटील प्रकरणात कटात सहभागी म्हणून ससूनचा कर्मचारी महेंद्र शेवते याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत या प्रकरणात ससूनमधील इतरांचीही भूमिका स्पष्ट होईल.” – रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त , गुन्हे