पुणे – घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाचे काम अंतीम टप्प्यात असताना आता पुणे-मिरज लोहमार्गावर उड्डाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रीज-आरओबी) बांधण्यासाठी लष्कराकडून आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाचा मार्गही मोकळा झाला आहे. लष्कराकडून देण्यात येणाऱ्या जागेच्या मोबदल्यात महापालिका लष्करासाठी निवासी घरे, सेवा वाहिन्यांची कामे तसेच काही प्रमाणात रोख मोबदला देणार आहे.
महापालिकेच्या एस्टेमेट कमिटीत या पूलास मान्यता देण्यात आल्यानंतर महापालिकेने निविदा प्रक्रीयाही सुरू केली होती. मात्र, काही जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने नुकतीच लष्कराचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये या प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीत भूसंपादनावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी या दोन्ही पुलांसाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान, सुमारे 636 मीटर लांबीचा हा पूल असून त्यासाठी 48 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या बैठकीत या प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्यात आला. हा रेल्वेपूल बांधताना पुणे कॅन्टोन्मेट, रेल्वे विभाग याची जागा आवश्यक आहे. संरक्षण विभागाने 2016 मध्येच कॅन्टोन्मेंटची 4 हजार 560 चौरस मिटर जागा हस्तांतरितासाठी परवानगी दिली आहे.
कॅम्पातून थेट मुंढवा…
पुणे-सोलापूर या लोहमार्गावरील पुलाचे काम अंतीम टप्प्यात आहे तर दुसऱ्या पुलासाठी कॅन्टोन्मेटच्या काही जागेची आवश्यकता असल्याने लष्कर आणि पालिका प्रशासन यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. हे दोन्ही पूल पूर्ण झाल्यानंतर कॅम्पातून वाहनांना थेट केशवनर-मुंढव्याकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. या रस्त्यावर दोन रेल्वेगेट असल्याने या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.