पुणे –संगमवाडी येथील आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाकडील 87 कोटी 11 लाख रुपयांचा धनादेश शुक्रवारी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला.
स्मारकाबाबत शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, समाजकल्याण उपायुक्त रवींद्र कदम पाटील, सहायक आयुक्त समाजकल्याण संगीता डावखर, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, रामभाऊ कसबे, डॉ. राजू अडागळे, शांतीलाल मिसाळ उपस्थित होते.
यावेळी आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाबाबत जागेचे भूसंपादन, स्मारकाचा नियोजित आराखडा, बांधकाम, त्याकरिता लागणारा निधीबाबत चर्चा करण्यात आली. भूसंपादनाची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पवार यांनी दिले