पुणे – कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास हा गुन्ह्याचा रचलेला कट, तयारी आणि घडलेली प्रत्यक्ष घटना अशा तीन दृष्टीने केला जात आहे. हा गुन्हा करण्यापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची जिथे बैठक झाली होती. त्या बैठकीबाबत चौकशी करण्याबरोबरच अटक केलेले आरोपी आणि गणेश मारणे याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करायचा आहे.
तसेच गोपनीय अहवालानुसार महत्त्वपूर्ण तपास करणे अद्याप बाकी आहे. त्यासाठी आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडीची मागणी तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी केली होती. त्यानुसार विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी सात आरोपींना दि. ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विठ्ठल शेलार, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकारी सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले, की आत्तापर्यंत या गुन्ह्यात १६ आरोपींना अटक झाली आहे. मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. आरोपींनी काही प्रॉपर्टी खरेदी केली आहे का? त्या अनुषंगाने तपास करायचा आहे.
विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या तपासात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे तपासायचे असल्याने आठ दिवस पोलीस कोठडी द्यावी, असे सांगितले. त्यावर आरोपींचे वकील केतन कदम यांनी पोलिसांना तपासाला पूर्ण वेळ दिला आहे. दरवेळी पोलीस नवीन थिअरी समोर आणतात. त्यामुळे कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी, असे सांगितले.
त्यावर तपासाच्या अनुषंगाने दरवेळी नवीन माहिती समोर येत असल्याचे उत्तर तपास अधिकारी यांनी दिले. गणेश मारणेला दि. ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यानुसार या आरोपींना देखील आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास अधिकारी तांबे यांनी केली. त्यानुसार आरोपींना दि. ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.