पुणे -महापालिकेकडून सांडपाणी प्रक्रीया केंद्रात प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर बांधकामासाठी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्या पाण्याची मागणी नोंदविणे, शुल्क जमा करणे, टॅंकर मालक निवडणे यासाठी मोबाइल ऍप सुरू करण्यात आले असले तरी शहरात जवळपास सगळीकडे बांधकामे सुरू असतानाही गेल्या 10 दिवसांत केवळ 36 टॅंकरच्या फेऱ्या झाल्याने पिण्याचे पाणी बांधकामांना वापरले जात असल्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. हा पाणी वापर अतिशय कमी असल्याने आता शहरातील बांधकामांची तपासणी करून ज्या ठिकाणी प्रक्रीया केलेले पाणी बांधकामासाठी वापरण्यात येत नसल्याचे आढळल्यास संबंधित बांधकाम थांबविण्याचा पुनरूच्चार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत आधीच पाणी कमी असल्याने शहरात पाणीकपात आहे, असे असताना बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास महापालिकेने मनाई आदेश काढले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
“ऍप’ला मिळेना प्रतिसाद….
महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पापर्यंत पाणी मिळावे यासाठी स्वतंत्र टॅंकरची सुविधा देण्यात आली आहे. हे पाणी मोफत असणार आहे तर पाण्यासाठीचा वाहतूक खर्च बांधकाम व्यावसायिकास द्यावा लागणार आहे. तर शहरात सात ठिकाणी ही सुविधा दिली असून बांधकाम व्यावसायिकांना पाणी घेण्याची प्रक्रीया सोपी व्हावी या उद्देशाने पालिकेने स्वतंत्र मोबाइल ऍपही विकसित केले आहे. मात्र, यावर आता पर्यंत केवळ 36 बांधकाम प्रकल्पांची नोंद झाली असून त्यांच्याकडून तेवढेच टॅंकर मागविण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्या पेक्षा कितीतरी अधिक बांधकामे शहरात सुरू आहेत.
बांधकाम विभागाकडून माहिती घेणार…
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बांधकाम विभागाकडून गेल्या दोन वर्षांत मान्यता दिलेल्या बांधकाम प्रकल्पांची माहिती घेण्यात येत आहेत. तसेच नव्याने परवानगीसाठी आलेल्या प्रकल्पांची माहिती घेण्यात येत असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. या सुविधेबाबत बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांना पत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासकडूनही स्पष्ट करण्यात आले.