National Hackathon Competition Pune | राष्ट्रीय हॅकेथाॅन स्पर्धेचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत देशभरातील 39 शहरांतून आलेले सातशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. भेडसावणाऱ्या समस्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडविण्यासाठी स्पर्धक सलग 24 तास काम करीत आहे. या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाणार आहे.
इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा इनोव्हेट यु टेकाथॉन एआयएसएसएमएसचे आयओआयटी कॉलेज येथे होत आहे. याप्रसंगी आयओआयटीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, इनोव्हेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, गणेश नाग, तेजस यादव, प्रणव आडकर, नरेंद्र गडदे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
आपला देश स्टार्ट अपचे हब आहे. या देशात उद्योजक निर्माण करण्यासाठी अशा पद्धतींचे उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. करमळकर म्हणाले. आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळत आहे, असे डाॅ. काळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसादामुळे आमची ऊर्जा आणखी वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे कल्पेश यादव यांनी व्यक्त केले.