पुणे – बेकायदेशीर पिस्तूल जवळ बाळगणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. त्याच्या मित्राच्या हातून पिस्तूलचा ट्रीगर दाबला गेल्याने गोळी मानेला चलटून गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणावर एका खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार आनंद घोलप यांनी दिलेल्या तक्रारीनूसार जखमी अभय वाईकर आणि अविष्कार धनवडे (रा.सांगरुण, खडकवासला) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोघेही गावात शेती करतात, तसेच त्यांच्याकडे पिस्तूलचा अधिकृत परवाना नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एका खासगी रुग्णालयातून त्यांना माहिती मिळाली की, एक तरुण पिस्तूलची गोळी लागून गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला आहे. त्यानूसार पोलीसांनी रुग्णालयात धाव घेतली असता अभय वाईकर हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले अविष्कार धनवडे, अनंता धायगुडे, सोमनाथ मानकर, मंगेश मानकर आणि अभय वाईकर घरासमोरील दहीहंडी कार्यक्रम पहात एका झाडाखाली थांबले होते. तेव्हा अभय वाईकरने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून अविष्कारला दाखवले.
अविष्कारने पिस्तूल हातात घेऊन ट्रीगर प्रेस केला असता, त्यातून गोळी सुटली. ती अभय याच्या गळ्याच्या उजव्या बाजूला लागून तो खाली कोसळला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान,पोलिसांनी घटनास्थळावरुन पिस्तूल हस्तगत केली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.