मंचर – आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील तळेघर येथील गणेश शंकर इस्टे (वय 38) हे अपघातात गंभीर जखमी होऊन कोमात गेले होते; परंतु मंचर (ता. आंबेगाव) येथील मॅक्स केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने उपचार करून त्यांना जीवदान दिले.
तळेघर येथील गणेश शंकर इस्टे यांचा अपघात मंचर घोडेगाव रस्त्यावर झाला होता. त्यांना चिंताजनक अवस्थेत मंचर येथील मॅक्स केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातामध्ये रुग्णाच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. चेहऱ्यालाही बराच मार होता. चेहऱ्याची हाडे मोडली होती. छातीच्या बरगड्या आणि डावा पाय गंभीरीत्या मोडला होता. रुग्ण हॉस्पिटलला दाखल केला त्यावेळेस श्वासोच्छ्वास घेण्याही त्यास त्रास होत होता.
हृदयाची ठोके आणि रक्तदाबही कमी होत चालला होता. अशा कठीण प्रसंगी डॉ. सचिन निकम, डॉ. नम्रता निकम, डा. समाधान जाधव, डॉ. मंजूश्री जाधव, डॉ. कुणाल जाधव, डॉ. प्रतीक पाटील, डॉ. शुभम टेकाळे, डॉ. सतीश ढेरे यांनी रुग्णाला धीर देत प्राथमिक उपचार केले. रुग्णाचे तात्काळ सिटीस्कॅन करण्यात आले.
न्यूरोसर्जन डॉ. सतीश ढेरे यांनी रुग्णाची तपासणी केली असता पुढील 72 तास हे रुग्णासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवरच होता. पेशंटच्या चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली आणि त्यानंतर तीन-चार दिवसांनी पायाच्या हाडाचीही यशस्वी सर्जरी करण्यात आली. रुग्ण आदिवासी भागातील असल्याने आर्थिक स्थिती नाजूक होती. त्याच्यावर झालेल्या चार शस्त्रक्रिया व कमीत कमी 20 ते 25 दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याचा, औषधांचा, रक्त तपासणीचा खर्च मोठा होता.
यासाठी मॅक्सकेअर हॉस्पिटलमधील जनसंपर्क अधिकारी अमित निकम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल माहिती दिली आणि सर्व कागदपत्रांची फाईल तयार करून रुग्णाच्या नातेवाइकांच्या हस्ते मंत्रालयात पोहोचती केली. या रुग्णासाठी सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींनी रुग्णाच्या नातेवाइकांनी आर्थिक मदत केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना एक लाख रुपयाची मदत मिळाली.
मॅक्स केअर हॉस्पिटलने ही ना नफा ना तोटा या तत्त्वावरच रुग्णासाठी काम केले. यावेळी मॅक्स केअर हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे आणि शरद बॅंकेचे संचालक प्रदीप आमुडकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचे पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्ण गणेश इस्टे यांना पत्र पाठवून आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले आपण लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्यावरील शस्त्रक्रियेसाठी, उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून निधी मंजूर केल्याचे त्यांनी म्हटले आहे .
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून अजूनपर्यंत हॉस्पिटलला ही योजना मिळालेली नाही. मात्र, “मॅक्स केअर’मध्ये ही योजना सुरू झाली तर आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील रुग्णांनाही याचा उपयोग होईल, यासाठी हॉस्पिटल प्रशासन काम करीत आहे.
डॉ. समाधान जाधव, संचालक, डॉ. प्रतीक पाटील, मॅक्स केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल