बारामती/जळोची – इन्स्ट्राग्राम आयडीवर कोयत्यासह फोटो ठेवल्याप्रकरणी युवकाला कोयत्यासह जेरबंद केले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बारामतीसह जिल्ह्यात कोयता गॅंग हा शब्द अलीकडच्या काळात चर्चेला जात आहे. त्यामुळ समाजामध्ये दहशत निर्माण केली जात आहे. इन्स्ट्राग्राम आयडीवरून कोयत्यासह एका युवकाचा फोटो ठेवला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली.
त्यांनी या माहितीची दखल घेत तात्काळ ही पोस्ट बारामती शहर पोलिसांना फॉरवर्ड करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तात्काळ कारवाईबाबत पाठपुरावा केला. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर,
दशरथ इंगवले, आकाश सीताफ, शाहू राणे यांनी तात्काळ इंस्टाग्रामवर कोयत्यासह आपला फोटो ठेवणाऱ्याचा शोध घेतला. अर्पित सचिन मोहिते (वय 22 रा. बारामती) याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. हौस म्हणून त्याने चार वर्षांपूर्वी काढलेला कोयत्यासोबतचा फोटो क्रेझ म्हणून स्वतःच्या इंस्टाग्रामवर ठेवला.
पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली. त्याच्या घरात वळचणीला ठेवलेला कोयता पोलिसांनी जप्त केला. ही पोस्ट डिलीट केली आहे. बारामती शहरांमध्ये कोणाच्याही डीपीवर गुन्हेगारी मजकूर, हत्यारे, खुन्नस शब्द याबाबतचे डीपीवर दिसून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.