वाघोली-वाघोलीमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप समाधान महाराज शर्मा यांचे हेलिकॉप्टरमधून झालेले आगमन चर्चेचा भाग बनले आहे. वाघोली येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शांताराम बापू कटके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. यातील विशेष उल्लेखनीय सेवा ही समाधान महाराज शर्मा यांची होती.
समाधान महाराज शर्मा यांना सांगली येथून वाघोलीत कीर्तनासाठी येण्यासाठी जवळपास पाच तासांहून अधिक कालावधी लागणार होता. वाघोलीतील कीर्तन सेवा होण्यात मोठ्या अडथळे निर्माण झाले होते. आयोजक शांताराम बापू कटके मित्र परिवाराच्या वतीने तातडीने महाराजांना वाघोलीतील कीर्तन सेवेसाठी हेलिकॉप्टरमधून आणण्यात आले. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी वाहनांचा वापर केला जातो; मात्र हेलिकॉप्टरमधून महाराजांची झालेले आगमन सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय बनले आहे.
सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. समाधान महाराज शर्मा यांचे वाघोलीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या कीर्तनरूपी सेवेतदेखील महाराजांनी शांताराम कटके यांनी कीर्तन महोत्सव आयोजन करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले. महाराजांनी यावेळी कटकेंच्या हटके कामाची कौतुक केले.