पुणे – पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे आणि दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आले. आज गुरुवार (दि. 28 सप्टेंबर) सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणेशाचे विसर्जन सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी झाले. यावेळी ढोल-ताशांच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात पुण्यनगरी दुमदुमल्याचे दिसून आले. डेक्कन येथील हौदात विसर्जन करण्यात आले.
पुणे शहरातील ऐतिहासिक गणेशोत्सव मिरवणुक पाहण्यासाठी सकाळपासूनच पुण्यासह जिल्ह्यातील भाविकांनी शहरात गर्दी केल्याचे दिसून आले. राज्यासह देश-विदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक मिरवणुक पाहण्यासाठी आले आहेत. सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान पावसानेही हजेरी लावली. अंगावर पावसाच्या सरी झेलत ढोल-ताशांचा गजर सुरुच होता. सगळीकडे गुलाल उधळला जात होता.गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…चा गजर सुरु आहे. पुण्यातील मुख्य पेठांमधील रस्ते हे भाविकांनी तुडुंब भरले आहेत. दरवर्षी पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देश-विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणे येत असतात. गेली 10 दिवस पुणे शहरात गणपती उत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण तयार झाले होते. आज बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रु तरळत होते.
मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती
पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला 1400 वर्षांचा इतिहास आहे. ही मूर्ती स्वयंभू असून, साडेतीन फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, असे म्हटले जाते. 1893 साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो. पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते.
मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी गणपती
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे.