Rajya Sabha Election । India Alliance : राज्यसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला झटका बसणार

Rajya Sabha Election । India Alliance – राज्यसभेतील १० सदस्य यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन कनिष्ठ सभागृहात पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या १० रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या सचिवालयाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
लोकसभेत जरी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीएचे संख्याबळ घटले असले तरी राज्यसभेत त्यांची ताकद वाढणार आहे ही भाजपसाठी दिलासा देणारी बाब आहे. त्याचे कारण ज्या राज्यांत राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे त्या राज्यांत भाजप किंवा भाजप आघाडीचे सरकार आहे.
कॉंग्रेसला मात्र दोन जागांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. कॉंग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि दीपेंद्र हुडा हे अनुक्रमे राजस्थान आणि हरियाणातून राज्यसभेवर गेले होते. हे दोन्ही नेते आता लोकसभेत गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
विशेष म्हणजे राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार आहे. ज्या १० जागा रिक्त झाल्या आहेत त्यातील ७ जागांवर भाजपचा कब्जा आहे. दोन जागा कॉंग्रेसकडे तर एका जागा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलाकडे आहे. बिहार, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांत प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत.
बिहारमध्ये एनडीएचे सरकार आहे तर महाराष्ट्र आणि आसाममध्ये भाजपचे मित्रपक्षांसोबत सरकार आहे. मध्य प्रदेशात भाजपकडे पूर्ण बहुमत आहे तर त्रिपुरातही भाजपचे सरकार आहे.
बिहारच्या दोन जागांपैकी एक जागा एनडीएला तर एक जागा इंडिया आघाडीला मिळू शकते. बिहारची एक जागा जरी इंडिया आघाडीला मिळाली तरी राज्यसभेतील १० पैकी ९ जागांवर भाजपचीच सरशी होणार आहे.





